दौंडच्या वायरलेस फाटा परिसरातील वीटभट्टीवरून १६ वर्षीय मुलगी बेपत्ता

अज्ञात व्यक्तीविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

 

 ✍🏻योगेश राऊत

 

दौंड (ता. दौंड) येथील वायरलेस फाटा परिसरातील वीटभट्टीवर राहणारी १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी घडली. भारती सुरेश शिंदे (वय १६ वर्षे) असे बेपत्ता मुलीचे नाव असून, तिला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या कुटुंबीयांनी दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमन भाऊसाहेब शिंदे (वय ५३) या मजुरीचे काम करतात. त्या सध्या सोमनाथ छगन आगलावे यांच्या वायरलेस फाटा, दौंड येथील वीटभट्टीवर कुटुंबासह राहतात. त्यांचे मूळ गाव आढळगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आहे.

सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भारती शिंदे ही राहत्या घरातून बेपत्ता झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

बेपत्ता मुलगी भारती हिचे वय १६ वर्षे असून, ती सातवीपर्यंत शिकलेली आहे. तिची उंची सुमारे चार फूट पाच इंच, केस लांब व काळे, रंग काळासावळा आणि बांधा मजबूत आहे. घटनेच्या वेळी तिने पांढऱ्या रंगाचा ठिपक्यांचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. तिच्या हातात दोन ड्रेस असलेली बाजारातील पिशवी होती. ती मराठी भाषा बोलते.

या प्रकरणाची नोंद दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७६६/२०२६ अन्वये करण्यात आली आहे. पोलीस हवालदार भालेराव यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार मखरे पुढील तपास करीत आहेत.

भारती शिंदे हिच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा दौंड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संबंधित माहिती असलेल्या नागरिकांना करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail