भीमा नदीकाठी काटेरी झुडपांच्या आडोशाला जुगार; पाच जणांविरुद्ध दौंड पोलिसांची कारवाई

वडगाव दरेकर येथे तीन पानी ‘तिरट’ जुगार सुरू असताना छापा; पत्त्यांसह २ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त

✍🏻योगेश राऊत

दौंड : दौंड तालुक्यातील वडगाव दरेकर येथे भीमा नदीच्या कडेला गावठाण हद्दीतील काटेरी झाडांच्या आडोशाला तीन पानी ‘तिरट’ नावाचा जुगार खेळ सुरू असल्याचे आढळून आले. याप्रकरणी दौंड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून पत्त्यांचा एक बॉक्स आणि रोख रक्कम असा एकूण २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) सायंकाळी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव दरेकर गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी गावठाण जागेत काटेरी झाडांच्या आडोशाला काही जण पत्त्यांद्वारे जुगार खेळत असल्याची बाब समोर आली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता, ज्ञानदेव सदाशिव बाराते (वय ४०), श्रीकृष्ण सदाशिव बाराते (वय ४३), बबन बापू खुळे (वय ३९), सचिन दादा कापसे (वय ३६, सर्व रा. वडगाव दरेकर, ता. दौंड) आणि सुहास सुभाष शितोळे (वय ४६, रा. फराटे गल्ली, दौंड) हे तीन पानी ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या कारवाईत जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारा ५२ पानांचा पत्त्यांचा एक बॉक्स आणि संबंधित व्यक्तींच्या अंगझडतीत मिळालेली रोख रक्कम जप्त करण्यात आली. अशी एकूण २ हजार ४५० रुपयांची रोकड मिळून आली. पत्त्यांच्या बॉक्सची किंमत ५० रुपये गृहीत धरून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ हजार ५०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७६७/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सोमनाथ बापू चौंडे यांनी फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार भालेराव यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार चमन शेख करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail