योगेश राऊत
दुष्काळाच्या संकटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार; महिलांच्या माध्यमातून मदतीसाठी पुढाकार
दौंड : पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना, दौंडच्या नगराध्यक्षा कु. दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे (पाटील) यांनी महिला भगिनींसमवेत तुकाई माता मंदिरात पावसासाठी साकडे घातले. बळीराजावरील संकट दूर होऊन दौंडसह संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. तसेच, या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकीतून योगदान देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पावसाअभावी शेती आणि शेतकऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींची जाणीव ठेवून, महिला भगिनींच्या माध्यमातून गरजू शेतकरी बांधवांना शक्य ते सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे म्हणाल्या, “पावसाअभावी शेतकरी बांधव आणि नागरिक चिंतेत आहेत. आई तुकाई मातेने लवकरात लवकर पाऊस पाडून बळीराजावरील संकट दूर करावे, हीच आमची मनापासून प्रार्थना आहे. या कठीण काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. महिला भगिनींच्या माध्यमातून मदतीसाठी योगदान देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
दौंड शहरातील पाणीप्रश्नाबाबत आपण संवेदनशील असून, नागरिकांना आवश्यक त्या उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद प्रयत्नशील राहील, असेही नगराध्यक्षा जगदाळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेविका उज्ज्वला परकाळे, नगरसेविका प्रणिता शिंदे जठार यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









