ओतूर आणि नारायणगावमधील चार घरफोड्यांची उकल; नाशिकपर्यंत १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी घेतला माग
योगेश राऊत
जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोड्या करून सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि ओतूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत जेरबंद केले आहे. या कारवाईत चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून १९ तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो ७७० ग्रॅम चांदी, दोन लाख रुपये रोख आणि गुन्ह्यांसाठी वापरलेली कार असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा करताना पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आरोपींनी वायरलेस वॉकी-टॉकीचा वापर केल्याचेही तपासात समोर आले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याच पद्धतीच्या घरफोड्या ओतूर आणि नारायणगाव परिसरातही झाल्याने पोलिसांसमोर या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आव्हान होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना पोलिसांना एक संशयित कार दिसून आली. या कारचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ओतूरपासून नाशिकपर्यंतच्या मार्गावरील सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिकमधील इंदिरानगर आणि वडाळा परिसरात संशयित वाहनाचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी कार नाशिक परिसरात राहणारा सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्यासोबत वसीम पठाण आणि अदनान पठाण हे दोघेही सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ओतूर पोलिसांच्या मदतीने नाशिक जिल्ह्यातील वडाळा आणि लासलगाव परिसरात सापळा रचला. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
1\. वसीम मुनीर पठाण (वय २९), रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक.
2\. अदनान युनूस पठाण (वय २६), सध्या रा. वडाळा, इंदिरानगर, नाशिक; मूळ रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड.
3\. सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख (वय ४०), रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत या आरोपींनी संबंधित घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून चोरीस गेलेले १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन किलो ७७० ग्रॅम चांदी, दोन लाख रुपये रोख रक्कम आणि घरफोडीसाठी वापरलेली कार असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे करताना पकडले जाऊ नये आणि एकमेकांशी संपर्क ठेवता यावा, यासाठी आरोपींनी वायरलेस वॉकी-टॉकीचा वापर केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी ही उपकरणेही जप्त केली आहेत. चोरीच्या चांदीचे दागिने विकत घेतल्याच्या आरोपावरून सागर अशोक शिंदे (वय ३०, रा. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) यालाही अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन आणि नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अशा एकूण चार घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
* ओतूर पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक २६५/२०२६
* ओतूर पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक २१८/२०२६
* ओतूर पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक १३७/२०२६
* नारायणगाव पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक २०३/२०२६
या गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील घरफोडी आणि चोरीसंबंधी तरतुदींनुसार गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, या टोळीने आणखी काही ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, सहायक फौजदार दीपक साबळे, पोलीस अंमलदार संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, भारत मोहोळ, चेतन पाटील तसेच ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नरेंद्र गोराणे, बाळशिराम भवारी, विशाल गोडसे आणि धनंजय पालवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत.









