बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे आणि ‘द वायर’चे पत्रकार मोहम्मद इरफान यांच्या हस्ते गौरव; सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारितेची दखल
योगेश राऊत
ग्रामीण आणि शहरी भागातील सामान्य नागरिकांचे प्रश्न, सामाजिक विषमता, प्रशासनातील त्रुटी तसेच शेतकरी आणि वंचित घटकांच्या समस्यांना आपल्या निर्भीड आणि परखड पत्रकारितेतून सातत्याने वाचा फोडणारे दौंड येथील पत्रकार सुमित सोनवणे यांचा संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे आणि ‘द वायर’चे पत्रकार मोहम्मद इरफान यांच्या हस्ते त्यांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे वाङ्मय व पुस्तके प्रदान करून गौरविण्यात आले. पत्रकारितेतील सामाजिक बांधिलकी आणि दहा वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई यांच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला. यानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२६ चा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. ४ रोजी पुण्यातील कोथरूड येथील गांधी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याच्या निमित्ताने ‘शिक्षण व्यवस्थेची परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे, ‘द वायर’चे पत्रकार मोहम्मद इरफान आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक श्रीरंजन आवटे यांनी सहभाग घेत शिक्षण व्यवस्थेतील आव्हाने, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि सामाजिक परिवर्तनातील शिक्षणाची भूमिका यावर विचार मांडले.
याच कार्यक्रमात पत्रकार सुमित सोनवणे यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करण्यात आला. गेल्या दशकभरापासून त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील विविध प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या अडचणी, वंचित घटकांवरील अन्याय, सामाजिक प्रश्न आणि प्रशासनातील त्रुटी यांना त्यांनी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडली आहे. केवळ घटना मांडण्यापुरते मर्यादित न राहता प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यांचा पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती पत्रकारिता क्षेत्रात विशेष ओळखली जाते.
सुमित सोनवणे यांनी गेल्या दहा वर्षांत आयबीएन लोकमत आणि न्यूज १८ या वृत्तवाहिन्यांमध्ये बातमीदार म्हणून काम केले आहे. या काळात त्यांनी विविध सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांना प्रसारमाध्यमांमध्ये स्थान मिळवून दिले. ग्रामीण भागातील दुर्लक्षित प्रश्नांपासून ते शहरी भागातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांपर्यंत अनेक विषय त्यांनी प्रभावीपणे मांडले.
पत्रकारिता ही केवळ माहिती देण्याचे माध्यम नसून समाजातील अन्याय, विषमता आणि प्रशासनाच्या त्रुटींवर प्रकाश टाकण्याचे महत्त्वाचे साधन आहे, या भूमिकेतून त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता वस्तुस्थिती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका यामुळे त्यांच्या पत्रकारितेची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाने त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला. यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सन्मानानंतर भावना व्यक्त करताना सुमित सोनवणे म्हणाले, “गेल्या दहा वर्षांपासून पत्रकारिता करताना समाजातील सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात काम करताना अनेक सामाजिक प्रश्न जवळून अनुभवता आले. या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि प्रशासनाचे लक्ष वेधणे, ही पत्रकार म्हणून आपली जबाबदारी आहे.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचे वाङ्मय मिळणे, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. विशेषतः बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे आणि ‘द वायर’चे पत्रकार मोहम्मद इरफान यांच्या हस्ते हा सन्मान मिळाल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
महात्मा फुले यांनी समाजातील विषमता, अन्याय आणि अज्ञानाविरोधात आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांचे वाङ्मय स्वीकारताना भविष्यातही सत्य, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करण्याची प्रेरणा मिळाली आहे. हा सन्मान माझ्यासाठी पुढील वाटचालीची नवी ऊर्जा आहे.”
पत्रकार सुमित सोनवणे यांच्या या सन्मानाबद्दल पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.









