पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांचा सामाजिक उपक्रम प्रेरणादायी

वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; अंगणवाडीतील चिमुकल्यांना खेळण्यांचे वाटप

योगेश राऊत

समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे, हा समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा उत्तम आविष्कार आहे. पत्रकारिता करताना सामाजिक जाणिवेचे भान जपत विविध उपक्रम राबविणारे पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी यांनी केले.

दौंड तालुक्यातील गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चोरमले वस्ती येथे पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन व पेन्सिलींचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील चिमुकल्यांना खेळणी आणि सर्व विद्यार्थ्यांना केळी देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी व केंद्रप्रमुख सुशा खरात यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले 

पत्रकार राजेंद्र सोनवलकर हे गेल्या वीस वर्षांपासून दैनिक आरंभ पर्वचे दौंड तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून परिसरातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांतही सक्रिय योगदान दिले आहे. गोपाळवाडी ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले असून, त्यांच्या विविध क्षेत्रांतील कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

आपला वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंदापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अंगणवाडीतील चिमुकल्यांनाही खेळणी मिळाल्याने त्यांच्या आनंदात भर पडली.

यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी म्हणाले की, पत्रकार राजेंद्र सोनवलकर हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते आणि शिक्षणाविषयीची आवड वाढण्यास मदत होते.

पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांनीही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यातदेखील आपल्या परीने शक्य ती मदत करण्याची ग्वाही दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असे उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास गोपाळवाडी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब गिरमे, शांताराम होले, मयुरेश शिंदे, भावी चेअरमन योगेश चोरमले, प्राध्यापक दिनेश पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता कुदळे, अॅड. किशोर टेकवडे, अंगणवाडी सेविका रेखाताई डोंगरे, आप्पासाहेब पवार, गणेश चोरमले, बेबीताई गिरमे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप होले सर यांनी केले. वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail