जयंतीनिमित्त स्वराज्यनिष्ठा, प्रसंगावधान आणि बलिदानाच्या स्मृतींना उजाळा
योगेश राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शत्रूवर तुटून पडणारे स्वराज्याचे शूर अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांची जयंती आज, ९ ऑक्टोबर रोजी साजरी होत आहे. ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ या ऐतिहासिक म्हणीतून त्यांचे अतुलनीय शौर्य, स्वामिनिष्ठा आणि प्रसंगावधान आजही महाराष्ट्राच्या जनमानसात जिवंत आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेल्या ऐतिहासिक प्रसंगात जिवाजी महाले यांनी दाखविलेल्या धाडसामुळे त्यांच्या नावाची नोंद मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतल्यानंतर आदिलशाहीकडून त्यांना रोखण्यासाठी अफजलखानाला मोठ्या सैन्यासह पाठविण्यात आले. स्वराज्यावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी महाराजांनी मुत्सद्देगिरी आणि युद्धनीतीचा अवलंब केला. अखेर १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची ऐतिहासिक भेट झाली.
या भेटीवेळी संभाव्य धोका लक्षात घेऊन महाराजांनी अंगरक्षकांसह आवश्यक खबरदारी घेतली होती. जिवाजी महाले हे महाराजांच्या विश्वासू अंगरक्षकांपैकी एक होते. भेटीदरम्यान अफजलखानाने महाराजांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली. महाराजांनी आत्मसंरक्षणासाठी वाघनखांचा वापर करून अफजलखानाचा प्रतिकार केला. त्यानंतर सय्यद बंडाने महाराजांवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
याच निर्णायक क्षणी जिवाजी महाले यांनी पुढे सरसावत सय्यद बंडाचा प्रतिकार केला. महाराजांच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेल्या धाडसी कृतीमुळे शिवाजी महाराजांचे प्राण वाचले. काही क्षणांच्या या संघर्षाने इतिहासाला निर्णायक वळण दिले. जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची आठवण म्हणूनच ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण प्रचलित झाली
जिवाजी महाले यांचे शौर्य केवळ तलवारीच्या ताकदीपुरते मर्यादित नव्हते. संकटाच्या क्षणी योग्य निर्णय घेणे, आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे आणि स्वामींच्या संरक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू होते. महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात अशा निष्ठावंत मावळ्यांचे योगदान मोलाचे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशस्वी वाटचालीत अनेक शूर सरदार, मावळे, अंगरक्षक आणि सामान्य सैनिकांनी आपले योगदान दिले. त्यापैकी जिवाजी महाले यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. त्यांच्या पराक्रमातून स्वराज्याच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या मावळ्यांची कर्तव्यनिष्ठा आणि धैर्य अधोरेखित होते
इतिहासात अनेक राजे आणि सेनापतींच्या पराक्रमाची चर्चा होते; मात्र त्यांच्यासोबत संकटाच्या वेळी खंबीरपणे उभे राहणाऱ्या निष्ठावंत सहकाऱ्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असते. जिवाजी महाले हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. प्रतापगडावरील ऐतिहासिक प्रसंगात त्यांनी दाखविलेल्या धाडसामुळे त्यांचे नाव पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान बनले.
त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी भारतीय टपाल विभागाने २०१४ मध्ये ‘वीर जिवाजी महाला – शिवाजी महाराजांचे अंगरक्षक’ या नावाने विशेष टपाल पाकीट प्रकाशित केले होते. या माध्यमातून त्यांच्या ऐतिहासिक योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली.
आजच्या काळात वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीचा संदेश केवळ ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण करण्यापुरता मर्यादित नाही. कर्तव्यनिष्ठा, धैर्य, संकटसमयी प्रसंगावधान, स्वामिनिष्ठा आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी ही मूल्ये नव्या पिढीने आत्मसात करणे आवश्यक आहे. इतिहासातील अशा वीरपुरुषांच्या जीवनकार्याची ओळख शालेय विद्यार्थ्यांपासून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्याला अभिवादन करताना स्वराज्यासाठी योगदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात वीरांचे स्मरण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यांच्या पराक्रमाची गाथा महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव प्रेरणेचा दीपस्तंभ म्हणून उजळत राहील.









