यवत प्रतिनिधी- संदीप भालेराव
यवत -: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ‘ट्रिगर १’ लागू झाल्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार यांच्या आदेशानुसार संपूर्ण तालुक्यात गेल्या ३० सप्टेंबरपासून नुकसान भरपाई व पंचनाम्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाला १० ऑक्टोबर रोजी अंतिम अहवाल सादर करावयाचा असल्याने, ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे अद्याप बाकी आहेत त्यांनी तातडीने संबंधित पथक प्रमुकांशी संपर्क साधून आपले पंचनामे पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी विनायक जगताप यांनी केले आहे.
पंचनामे विनाअडथळा पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये कामटवाडी, जावजी बुवाचीवाडी आणि तांबेवाडीचे ग्राम महसूल अधिकारी, नांदूरचे सहाय्यक कृषी अधिकारी तसेच बोराटेवस्तीचे ग्रामपंचायत अधिकारी यांची पथक प्रमुख म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कोणताही पात्र शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे नोटीस बोर्ड तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व संबंधित शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी आपले पंचनामे करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









