डाळिंब येथील खूनप्रकरणाचा उलगडा; संशयित आरोपीला अटक

योगेश राऊत

किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याचा आरोप; मृतदेह विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यातील डाळिंब येथे बेपत्ता झालेल्या ३५ वर्षीय भिमाशंकर धोंडीबा खंडागळे यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात यवत पोलिसांना आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी विजय सुभाष लेचरूड (वय ४०, रा. डाळिंब, ता. दौंड) याला १५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. किरकोळ शिवीगाळीचा राग मनात धरून खून केल्याची कबुली संशयित आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास डाळिंब येथील नंदा धोंडीबा खंडागळे (वय ५१) यांचा मुलगा भिमाशंकर हा राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी नंदा खंडागळे यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी डाळिंब गावच्या हद्दीतील रमेश म्हस्के यांच्या विहिरीत भिमाशंकर याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे हात-पाय लोखंडी तारेने बांधलेले होते. तसेच मृतदेहाला मोठा दगड बांधून तो विहिरीत टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले. या प्रकारावरून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्याचा संशय बळावला.

त्यानंतर पोलिसांनी मूळ गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि २३८ ची वाढ करून तपासाला गती दिली.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी विजय सुभाष लेचरूड याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, भिमाशंकर याने किरकोळ शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर मृतदेहाचे हात-पाय लोखंडी तारेने बांधून, त्याला मोठा दगड बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विहिरीत फेकल्याची माहितीही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी विजय लेचरूड याला १५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, अक्षय मोरे, दशरथ नंदीवाले, ज्ञानेश्वर राऊत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासो थिकोळे तसेच यवत पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे करीत आहेत. या कारवाईमुळे डाळिंब येथील खूनप्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail