योगेश राऊत
अस्ताव्यस्त पार्किंग, अपघातांचा धोका आणि वाढती ऊस वाहतूक यामुळे नागरिक त्रस्त; मराठा महासंघाचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
दौंड : दौंड शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अस्ताव्यस्त पार्किंग आणि अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे नागरिकांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज असताना या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी दौंड शहर व तालुका मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दौंड शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून, प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. रस्त्यांवर वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने विद्यार्थी, व्यापारी, नागरिक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे अपघातांचा धोकाही वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्याने दौंड शहर व परिसरात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉलींची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महासंघाने केली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या मागील बाजूस तसेच आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर बसविणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील शाळा, महाविद्यालये, दवाखाने, शासकीय कार्यालये, बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे. रस्त्यांवरील नियमबाह्य पार्किंगला आळा घालून निश्चित पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच रस्त्यांच्या मधोमध असलेले उंच किंवा खोल चेंबर्स रस्त्याच्या समपातळीत आणून त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या तसेच रस्त्यावर अडथळे निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी. मुख्य रस्त्यांसह सहकार चौक ते नवीन प्रशासकीय इमारत या मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दौंड शहरात विविध दिशांनी येणारी वाहतूक कमी करण्यासाठी बायपास रस्ते विकसित करण्याची मागणी महासंघाने केली आहे. यासोबतच नागरिक आणि वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करून अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंग आणि रस्त्यांच्या समस्यांवर संबंधित विभागांनी संयुक्तपणे नियोजन करून तातडीने कार्यवाही करावी. नागरिकांची सुरक्षितता आणि दैनंदिन प्रवास सुलभ करण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा दौंड शहर व तालुका मराठा महासंघाने व्यक्त केली आहे. यावेळी महासंघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.









