महिलांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ; ‘नारीशक्ती महोत्सव’ उत्साहात संपन्न

योगेश राऊत

दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचा पुढाकार; २०१ महिलांना मोफत कौशल्य प्रशिक्षण, बचत गट निर्मिती आणि आरोग्य तपासणी उपक्रमांवर भर

दौंड : महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासह त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कु. दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे (पाटील) यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय उपक्रम उत्साहात संपन्न झाला. विविध स्पर्धा आणि उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महोत्सवात रांगोळी, पारंपरिक वेशभूषा, उपवास पाककला, खाद्यपदार्थ निर्मिती, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, नृत्य, गायन, नाट्य आणि मेहंदी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या माध्यमातून महिलांना आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी मिळाली. अनेक महिलांनी प्रथमच अशा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यालाही महिलांची मोठी उपस्थिती होती.

महिलांना केवळ स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता, त्यांना स्वतःची कला सादर करण्यासाठी आणि एकमेकींशी संवाद साधण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले. नगराध्यक्षा दुर्गाताईंनी महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून दिली, अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या कौशल्यविकासासाठी नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांच्याकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात २०१ महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच महिलांना बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रोत्साहन देणे, शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे आणि आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे, अशा उपक्रमांवर भर देण्यात आला आहे.

याच प्रयत्नांचा पुढील टप्पा म्हणून नवरात्रोत्सवात ‘नारीशक्ती महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले. महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे, सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणे आणि महिलांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश होता.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी नगरसेविका उज्ज्वलाताई परकाळे, प्रणिता शिंदे जठार, स्वातीताई सावंत आणि राणीताई लष्करे, तसेच सरोज भैनवाल, ज्योती आवटी आणि केतकी परकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धांचे नियोजन, महिला स्पर्धकांशी समन्वय आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी यासाठी त्यांनी योगदान दिले. मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट, रोटरी क्लब ऑफ दौंड, संपूर्ण आयोजन समिती आणि सहकारी कार्यकर्त्यांचेही सहकार्य लाभले.

महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ, त्यांच्या आत्मविश्वासाला बळ आणि आर्थिक-सामाजिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक ठरला. महिलांसाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail