मतदानासाठी ११ प्रकारचे ओळख पुरावे ग्राह्य; मतदारांनी ओळखपत्र सोबत ठेवावे

विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची माहिती; पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी मतदान

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्रासह अन्य १० प्रकारचे ओळख पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यापैकी कोणताही एक वैध पुरावा सादर करून मतदारांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये आणि प्रत्येक पात्र मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने ओळख पटविण्यासाठी पर्यायी कागदपत्रांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मतदान केंद्रावर मतदारांची ओळख निश्चित करण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र (ईपीआयसी) सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, काही कारणास्तव मतदार ओळखपत्र सादर करता न आल्यास निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या अन्य १० पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून ओळख पटविता येणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी जाताना आवश्यक ओळखपत्र सोबत ठेवावे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी पुढील पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

१. मतदार छायाचित्र ओळखपत्र (ईपीआयसी).

२. आधार कार्ड.

३. वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स).

४. पॅन कार्ड.

५. पारपत्र (पासपोर्ट).

६. केंद्र किंवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खासगी औद्योगिक संस्थांनी कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र.

७. खासदार, आमदार किंवा विधान परिषद सदस्यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे.

८. संबंधित शिक्षक किंवा पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहेत, त्या संस्थेने जारी केलेले सेवा ओळखपत्र.

९. विद्यापीठाने वितरित केलेले मूळ पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र.

१०. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र.

११. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशिष्ट दिव्यांगत्व ओळखपत्र (यूडीआयडी).

पदवीधर आणि शिक्षकमतदारसंघांच्या निवडणुकीत पात्र मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला लोकशाही हक्क बजावावा. मतदानासाठी बाहेर पडताना मतदारांनी मतदार ओळखपत्र किंवा निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पर्यायी ओळख पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत ठेवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी असून, मतदारांनी वेळेचे नियोजन करून मतदानाचा हक्क बजावावा, असेही प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail