दौंड शहरातील पथदिव्यांचा प्रश्न मार्गी; १३३ खांबांवर नवीन दिवे बसविण्याचे काम सुरू

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांच्या पाठपुराव्याला यश; वर्षभरापासून अंधारात असलेल्या परिसरांना दिलास

 

संपादक – योगेश राऊत

दौंड : दौंड शहरातील गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली असून, शहरातील विविध भागांतील एकूण १३३ खांबांवर नवीन दिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नगराध्यक्षा कु. दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) सातत्याने पत्रव्यवहार आणि ई-मेलद्वारे पाठपुरावा केल्याने या कामाला गती मिळाली आहे. या कार्यवाहीमुळे रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दौंड शहरातील नगरमोरी चौक, उड्डाणपूल परिसर, संयोग हॉटेल, राजधानी हॉटेल, गोल राऊंड ते बोरावके नगर, गोकुळ हॉटेल परिसर तसेच एसआरपीएफ ते लोखंडे वस्ती या भागांतील पथदिवे दीर्घकाळ बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्रीच्या वेळी या परिसरात अंधार असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही पथदिवे सुरू असणे आवश्यक होते.

या समस्येची दखल घेत नगराध्यक्षा जगदाळे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. पत्रव्यवहार, ई-मेल आणि विभागीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बंद पथदिव्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर संबंधित परिसरातील पथदिवे सुरू करण्याची कार्यवाही करण्यात आली असून, प्रकाशव्यवस्था सुधारण्यासाठी १३३ खांबांवर नवीन दिवे बसविण्याचे काम सुरू झाले आहे.

हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून, उर्वरित ठिकाणांवरील कामेही येत्या काही दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि वस्ती परिसरात रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पथदिव्यांमुळे रस्त्यांवरील दृश्यमानता वाढण्याबरोबरच रात्रीच्या वेळी नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

या वेळी नगरसेवक मुकेश जगताप, विकास लोंढे तसेच प्रभागातील सहकारी उपस्थित होते.

शहरातील मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असून, पथदिव्यांची उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail