पुणे शहरात लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक

८ गुन्ह्यांची उकल; ५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ची कारवाई

संपादक – योगेश राऊत

पुणे : पुणे शहरातील विविध भागांतून लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक २ ने अटक केली आहे. कुमार मरीअप्पन (वय ३३) आणि कृष्णा औलोडन (वय २५, दोघेही रा. तामिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे आठ लॅपटॉप आणि आठ मोबाईल असा एकूण अंदाजे पाच लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे हडपसर, खराडी आणि चंदननगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक २ चे अधिकारी आणि कर्मचारी पुणे शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस हवालदार परेश सावंत आणि पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे यांना दोन संशयित व्यक्तींबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुमार मरीअप्पन आणि कृष्णा औलोडन या दोघांना ताब्यात घेतले.

त्यानंतर त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांच्याकडून चोरीचे आठ लॅपटॉप आणि आठ मोबाईल फोन असा एकूण पाच लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपासात पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले आठ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

या कारवाईत हडपसर पोलीस ठाण्यातील एक, खराडी पोलीस ठाण्यातील पाच आणि चंदननगर पोलीस ठाण्यातील दोन अशा एकूण आठ गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला आहे.

 

* हडपसर पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०१/२०२६.

 

* खराडी पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७९/२०२६, ३६४/२०२६, ३८३/२०२६, २०६/२०२६ आणि २१६/२०२६.

* चंदननगर पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८९/२०२६ आणि २८२/२०२६.

या सर्व गुन्ह्यांची भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये नोंद करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक कुरळे, पोलीस हवालदार परेश सावंत, पोलीस हवालदार महेश बारवकर, पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे आणि पोलीस अंमलदार सचिन कांबळे यांनी केली.

या कारवाईबाबत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येतात का, तसेच चोरीच्या मुद्देमालाबाबत पुढील तपासात काय माहिती समोर येते, याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail