सुप्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री चार घरफोड्या, सव्वादोन तोळे सोने अन् ३८ किलो साखर लंपास

सुतारवाडा, माळावरील गणपती मंदिर परिसरासह वरच्या पेठेला चोरट्यांचे लक्ष्य; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू

प्रतिनिधी – गणेश जाधव

सुपे : बारामती तालुक्यातील सुपे परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री चार बंद घरांना लक्ष्य करत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनांमध्ये सुमारे सव्वादोन तोळे सोने, चांदीच्या वस्तू आणि तब्बल ३८ किलो साखर चोरट्यांनी लंपास केली आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या पोलिस गस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सुप्यातील सुतारवाडा परिसरात राहणारे वैभव भोईटे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाची उचकापाचक करून त्यातील सव्वादोन तोळे सोने आणि चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारला. चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

याच रात्री चोरट्यांनी माळावरील गणपती मंदिर परिसरातील सूर्यभान जाधव, वरच्या पेठेतील रविंद्र चांडगुडे आणि सुदाम नेवसे यांच्या बंद घरांनाही लक्ष्य केले. या ठिकाणीही घरांची कुलपे तोडून चोरी करण्यात आली. विशेष म्हणजे, एका घरातून चोरट्यांनी तब्बल ३८ किलो साखरही चोरून नेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरट्यांनी मौल्यवान वस्तूंसह घरातील किरकोळ साहित्यावरही हात साफ केल्याचे दिसून येत आहे.

या चोरीच्या काही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुपे परिसरातील कौलेवाडी येथेही घरफोडीची घटना घडली होती. राजेंद्र मल्हारी चौधरी यांच्या घरातून चोरट्यांनी अडीच तोळ्यांचे गंठण आणि कर्णफुले चोरून नेली होती. या घटनेत घरातील महिलेला कोयत्याचा धाक दाखविण्यात आल्याची माहितीही समोर आली होती.

एकापाठोपाठ घडणाऱ्या घरफोड्यांमुळे सुपे आणि परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून संशयितांवर लक्ष ठेवावे, तसेच घरफोडीच्या घटनांचा तातडीने तपास करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail