पंढरीच्या पांडुरंगावर श्रद्धा ठेवत शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने शेतीच्या कामात व्यस्त
संपादक- योगेश राऊत
कानगाव : खरीप हंगाम सुरू झाला असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी राहिली आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप पिकांचे नियोजन कोलमडले असून शेतीच्या उत्पादनाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, कितीही संकटे आली तरी हार न मानता नव्या उमेदीने शेतीत राबणारा बळीराजा आजही खंबीरपणे उभा असल्याचे चित्र कानगाव (ता. दौंड) येथील गणेशवाडी परिसरात पाहायला मिळत आहे.
गणेशवाडी येथील शेतकरी पांडुरंग शिवाजी फडके यांच्या शेतात उन्हाळी कांदा लागवडीच्या कामाला सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत, पावसाच्या अनिश्चिततेवर मात करण्याचा निर्धार करीत त्यांनी पुन्हा एकदा शेतीच्या कामाला गती दिली आहे. शेतातील कांदा लागवडीचे सुरू असलेले काम हे शेतकऱ्यांच्या जिद्दीचे आणि कष्ट करण्याच्या वृत्तीचे प्रतीक ठरत आहे.
शेती हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. कधी अतिवृष्टी, तर कधी पावसाची ओढ, कधी पिकांवर रोगराई, तर कधी बाजारभावातील चढ-उतार अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. तरीही प्रत्येक हंगामात नव्या आशेने शेतकरी आपल्या शेतात घाम गाळत असतो. यंदाही पावसाने अपेक्षित साथ दिली नसली, तरी बळीराजाने शेतीची उमेद सोडलेली नाही.
याबाबत शेतकरी पांडुरंग शिवाजी फडके म्हणाले की, शेतीमध्ये कितीही संकटे आली, कितीही अडचणी निर्माण झाल्या, तरी आम्ही शेतकरी त्यांचा सामना करण्यासाठी नेहमीच तयार असतो. पंढरीच्या पांडुरंगाची कृपा आमच्यासारख्या शेतकऱ्यांवर कायम आहे, होती आणि यापुढेही राहील, असा आमचा ठाम विश्वास आहे. याच श्रद्धेच्या आणि आशेच्या बळावर आम्ही पुन्हा नव्या जोमाने शेतीच्या कामाला सुरुवात करतो.
एकीकडे निसर्गाची परीक्षा, तर दुसरीकडे आर्थिक अडचणी अशा दुहेरी संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या कष्टातूनच शेतीचे चक्र सुरू आहे. पावसाने साथ दिली नाही म्हणून थांबून न राहता, उपलब्ध परिस्थितीत मार्ग काढत कांदा लागवडीसारख्या कामांना सुरुवात करणारा शेतकरी हा खऱ्या अर्थाने जिद्द आणि मेहनतीचा आदर्श आहे.
‘आशेवर जगणारा आणि कष्टावर विश्वास ठेवणारा बळीराजा कधीच हार मानत नाही,’ याचीच प्रचिती कानगाव गणेशवाडी येथील कांदा लागवडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा येत आहे.









