वाणेवाडीत सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचा २२ वा वर्धापनदिन उत्साहात

 

ज्येष्ठ नागरिकांना काठ्यांचे वाटप; शासकीय योजनांसह आनंदी जीवन जगण्याबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन

 

✍🏻योगेश राऊत

ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्याशी संलग्न असलेल्या व मान्यताप्राप्त नोंदणीकृत श्री सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, वाणेवाडी (ता. बारामती) यांचा २२ वा वर्धापनदिन मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासह त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना शासकीय योजनांची माहिती देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

 

ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग लाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास महासंघाचे उपाध्यक्ष आनंदराव शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रमेश शिळीमकर यांच्या प्रास्ताविकाने झाली.

यावेळी ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग लाड, उपाध्यक्ष आनंदराव शिंदे, श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ, कोळकी (ता. फलटण) येथील सचिव बाबुराव ढमाळ, नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, पाटसच्या सभासद सौ. विजया लाड तसेच वाणेवाडीचे ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

वाणेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना काठ्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात आधार मिळण्यास मदत होणार असून, ग्रामपंचायतीच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमात संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर जगताप तसेच श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ, कोळकीचे सचिव बाबुराव ढमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांचे सामाजिक योगदान आणि त्यांच्या सन्मानाचे महत्त्व याविषयी त्यांनी विचार मांडले.

आनंदराव शिंदे आणि डॉ. पांडुरंग लाड यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, विधवा व परित्यक्ता महिलांसाठीच्या योजना, आयुष्मान भारत आरोग्य योजना, आयुष्मान वय वंदना योजना तसेच आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठीच्या अधिनियमाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली माहिती, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि आरोग्यविषयक सुविधांचा उपयोग याबाबतही त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. उर्वरित आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानाने कसे जगावे, याविषयी त्यांनी मोलाचे विचार मांडले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंतराव भोसले, उपाध्यक्ष मनोहर जगताप, सचिव गोविंदराव चव्हाण, पोपटराव भोसले तसेच संघाच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संघाचे सचिव गोविंदराव चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थितांना अल्पोपहार देऊन वर्धापनदिन सोहळ्याचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail