११ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; प्रमाणपत्र, ट्रॉफी, सुवर्णपदक रोख व पारितोषिकाने गौरव
कुरकुंभ प्रतिनिधी : सुरेश बागल
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी डायमंड टॅलेंट फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या बौद्धिक विकास व स्पर्धा परीक्षा उपक्रमात उल्लेखनीय यश संपादन केले. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेला शाळेतील एकूण ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ११ विद्यार्थ्यांनी विविध क्रमांक व पारितोषिके मिळवत घवघवीत यश संपादन केले.
विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच बौद्धिक क्षमता, सामान्यज्ञान तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची सवय निर्माण व्हावी, या उद्देशाने डायमंड टॅलेंट फाउंडेशनच्या माध्यमातून या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली.
इयत्ता दुसरीतील शिवज्ञा महेंद्र जाधव हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. इयत्ता तिसरीतील अथर्व अमोल जाधव याने तृतीय क्रमांक मिळविला, तर स्वरांजली परमेश्वर शिंदे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. याच वर्गातील मनीषा गोरख कुचेकर हिने सुवर्णपदक पटकावले.
इयत्ता चौथीतील शिवराज मंगेश निंबाळकर याने तृतीय क्रमांक मिळविला. उत्कर्ष गणेश निंबाळकर व प्रज्वल सोमनाथ भागवत यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
इयत्ता पाचवीतील माहेश्वरी हनुमंत होले आणि आर्या अतुल कोंडे यांनी सुवर्णपदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. इयत्ता सातवीतील साईनाथ विजय जागीरदार याला उत्तेजनार्थ पारितोषिक, तर प्रथमेश विकास निंबाळकर याने सुवर्णपदक मिळविले.
याशिवाय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत मनीषा कुचेकर, तर चित्रकला स्पर्धेत समीरा सय्यद हिने उत्कृष्ट कामगिरी केली. या विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र, ट्रॉफी, सुवर्णपदक तसेच रोख स्वरूपाचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील बक्षीस वितरण कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी सन २०२५ मध्ये इयत्ता सातवीमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही अल्कली अमाईन्स कंपनीच्या वतीने शालेय साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक आदेश भागवत, द्वितीय क्रमांक अमन कुमार निसाद आणि तृतीय क्रमांक साईनाथ जागीरदार यांचा समावेश होता.
कार्यक्रमास डायमंड टॅलेंट फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक दीपक चव्हाण, पांढरेवाडीचे पोलीस पाटील व पोलीस पाटील संघाचे तालुकाध्यक्ष विलास येचकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास निंबाळकर, सदस्य श्रद्धा जाधव, दिपाली जाधव, परमेश्वर शिंदे तसेच डायमंड परीक्षा सराव शाळेतील शिक्षक मच्छिंद्र रामगुडे, महेंद्र भोसले, अविनाश अडसूळ, उज्ज्वला जगताप, छाया साळवे आणि उर्मिला गुजर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे काम शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ बोंगाळे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा परिसरातून समाधान व्यक्त करण्यात आले.









