पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान; दुचाकीचालकाविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल
योगेश राऊत
दौंड तालुक्यातील स्वामीचिंचोली पुलासमोरील पेट्रोलपंपाजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी दुसऱ्या दुचाकीच्या चालकाविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि. २२ सप्टेंबर) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्वामीचिंचोली गावच्या हद्दीत, पुलासमोरील पेट्रोलपंपाजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर हा अपघात घडला. लालाभाई वाघाभाई भरवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर) हा बजाज कंपनीच्या लाल रंगाच्या प्लॅटिना दुचाकीवरून (क्र. केए २३ ईके ९४८७) प्रवास करत होता. यावेळी त्याने पुणे-सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या बजाज प्लॅटिना दुचाकीला (क्र. एमएच ४२ पी ४१७१) धडक दिली.
या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरून प्रवास करणारे भारत गोपीनाथ भोसले आणि त्यांच्या पत्नी मीरा भारत भोसले (रा. वरखंड, ता. दौंड) यांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती झाल्या. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. दुचाकीचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची तक्रार दत्तात्रय गोपीनाथ भोसले (वय ५०, व्यवसाय शेती, रा. वरखंड, ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात दिली.
त्यानुसार लालाभाई वाघाभाई भरवाड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१, ३२४ (२) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार पवार यांनी काम पाहिले असून, पुढील तपास पोलीस नाईक पानसरे करीत आहेत.









