चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अटक; सहा गुन्ह्यांची उकल

स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांची संयुक्त कारवाई; ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने व दुचाकीसह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

योगेश राऊत

दौंड, दि. १२ ऑक्टोबर २०२६ : दौंडसह यवत, वडगाव निंबाळकर आणि जेजुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटनांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून सुमारे ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकल असा एकूण नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीच्या घटना घडल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची बैठक घेऊन मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पोलिसांनी गुन्हे घडलेली ठिकाणे, घटनांची वेळ आणि आरोपींकडून वापरली जाणारी कार्यपद्धती यांचा सविस्तर आढावा घेतला. विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये साम्य असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्या अनुषंगाने माहिती संकलित केली. गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यांमध्ये दीपक बलभीम पवार (वय २८, रा. आरोळे वस्ती, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि युवराज सचिन लोखंडे (वय २४, रा. उद्धट, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

दोन्ही आरोपी जामखेड परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे जाऊन शोधमोहीम राबवली. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन गुन्ह्यांबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सहा गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या चौकशीत पुढील गुन्हे उघडकीस आले आहेत.

– दौंड पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७२/२०२६ आणि ६३२/२०२६.

– यवत पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक ९६४/२०२६ आणि ९३०/२०२६.

– वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक १६३/२०२६.

– जेजुरी पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक २०५/२०२६.

या गुन्ह्यांपैकी बहुतांश प्रकरणे भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२) व ३(५) अन्वये, तर यवत येथील एका प्रकरणाची नोंद कलम ३०३(२) अन्वये करण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे.

आरोपींकडून पोलिसांनी सुमारे ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यांत वापरली किंवा संबंधित असलेली मोटारसायकल असा एकूण नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे दौंडसह परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनांचा तपास पुढे जाण्यास मदत झाली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब धडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर वाघमारे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, राजू मोमीन, विकास कापरे, भारत मोहोळ, चेतन पाटील आणि दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अंतुल पठाण व अंकुश दळवी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail