योगेश राऊत
पुणे-अहिल्यानगर lरस्त्यावरील नगर मोरी चौकात पहाटे तीनच्या सुमारास कारवाई; पिकअपसह ९ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
दौंड : दौंड शहरातील पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील नगर मोरी चौकात विनापरवाना वाहतूक होत असल्याचा आरोप असलेल्या इंडेन कंपनीच्या ७० रिकाम्या गॅस सिलिंडर टाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईत सिलिंडर टाक्यांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा कंपनीची पिकअप जीप असा एकूण ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे तीनच्या सुमारास दौंड हद्दीतील पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील नगर मोरी चौक येथे ही कारवाई करण्यात आली. नितीन बापू बरकडे (रा. देवगाव बुद्रुक, ता. परांडा, जि. धाराशिव) आणि तुषार सुरेश नलावडे (रा. चिखली, पिंपरी-चिंचवड, पुणे) हे दोघे पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप जीपमधून इंडेन कंपनीच्या घरगुती वापराच्या ७० रिकाम्या गॅस सिलिंडर टाक्या घेऊन जात असताना आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित सिलिंडर टाक्यांची साठवणूक व वाहतूक करण्यासाठी आवश्यक वैध परवाना आरोपींकडे नव्हता. जीवनावश्यक वस्तू असलेल्या गॅस सिलिंडर टाक्यांची विनापरवाना साठवणूक आणि वाहतूक केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत प्रत्येकी अंदाजे २ हजार ५०० रुपये किमतीच्या ७० रिकाम्या सिलिंडर टाक्या, असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अंदाजे ७ लाख ५० हजार रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची पिकअप जीप (क्रमांक एमएच ०९ जीजे ८६३९) ताब्यात घेण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ९ लाख २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रमेश चंदर साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७६८/२०२६ अन्वये जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील कलम ३ व ७ तसेच एलपीजी (पुरवठा व वितरणाचे नियमन) आदेश, २००० मधील कलम ७(१)(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिद्री करीत आहेत.









