दिनेश पवार : विशेष प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रंथालय विभागाच्या वतीने शब्दकोश ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) एकनाथ मुंढे यांच्या हस्ते या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. शोभा कोरडे यांनी केले.
यावेळी बोलताना प्राचार्य प्रा. (डॉ.) एकनाथ मुंढे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या शब्दसंपत्तीत वाढ व्हावी तसेच विविध शब्दकोशांच्या माध्यमातून भाषेचे ज्ञान समृद्ध व्हावे, या उद्देशाने शब्दकोश ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शब्दकोश हा भाषेचे आकलन वाढविण्यासाठी आणि अचूक शब्दप्रयोग शिकण्यासाठी महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासून आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या ग्रंथप्रदर्शनाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी भेट देऊन विविध शब्दकोश आणि ग्रंथांची पाहणी केली. शब्दांचे अर्थ, त्यांचा वापर आणि भाषिक ज्ञान समृद्ध करण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरले.









