दौंडमध्ये कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोनवडी नदी पुलाजवळील टपरीजवळ आडोशाला जुगार सुरू असल्याचा आरोप; एकाविरुद्ध गुन्हा दाखल 

योगेश राऊत

दौंड तालुक्यातील सोनवडी येथे कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नजीर गुडुभाई सय्यद (वय ३५, रा. सोनवडी, ता. दौंड, जि. पुणे) हा सोनवडी नदी पुलाजवळ एका टपरीजवळ आडोशाला कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवत असल्याची नोंद पोलिसांच्या फिर्यादीत करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली असता, संबंधित व्यक्तीकडून ७३० रुपये रोख रक्कम, एक निळ्या रंगाचा बॉलपेन आणि आकडे लिहिलेली एक कागदी स्लिप बुक असा एकूण ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस शिपाई प्रविण किसन राऊत यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८०९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मखरे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सहायक फौजदार साबळे यांनी केली.

 

जुगारासारख्या अवैध प्रकारांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असून, नागरिकांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail